Tuesday, 5 May 2020

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ संक्षिप्त, नियम, आपले प्रश्न आणि महत्वाच्या लिंक्स.

(१). राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३

सामान्य जनतेला आपली भूक भागवून सन्मानपूर्वक जीवन जगता यावे यासाठी अतिशय कमी किमतीला दर्जेदार धान्य उपलब्ध करून देणे हा या कायद्याचा प्रमुख उद्देश आहे.

या कायद्यांतर्गत शिधापत्रिका धारकांचे प्रामुख्याने दोन गट करण्यात आले आहेत. APL (Above Poverty Line - गरिबी रेषेवरील कुटुंब) आणि BPL (Below Poverty Line - गरिबी रेषेच्या आतील कुटुंब).

१. APL (Above Poverty Line - गरिबी रेषेवरील कुटुंब) : या अंतर्गत शहरी भागामध्ये ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु १५००० ते रु १ लाख च्या आत आहे असे केशरी शिधापत्रिका धारक यांचा समावेश होतो. या शिधापत्रिका धारकांपैकी शहरी भागामध्ये ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु १५००० ते रु ५९००० च्या आत आहे असे आणि ग्रामीण भागात ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु १५००० ते रु ४९००० च्या आत आहे असे केशरी शिधापत्रिका धारक यांचा "प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी" (PHH) या गटात समावेश करण्यात आला आहे. या गटातील कुटुंबांना स्वस्त दरात प्रति व्यक्ती ५ किलो धान्य म्हणजेच गहू ३ किलो रु २ प्रति किलो आणि तांदूळ २ किलो रु ३ प्रति किलो या दराने पुरविण्यात येते. या व्यतिरिक्त उपलब्धतेनुसार प्रति शिधापत्रिका १ किलो तुरदाळ रु ५५ आणि १ किलो चणादाळ रु ४५ या दराने पुरविण्यात येते.

२ (१). BPL (Below Poverty Line - गरिबी रेशी खालील कुटुंब) : ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु १५००० च्या आत आहे अश्या पिवळ्या शिधापत्रिका धारकांचा समावेश "अंत्योदय अन्न योजना" (AAY) या गटात करण्यात आला आहे. या गटातली कुटुंबाला दोन व्यक्ती असतील तर प्रति व्यक्ती ५ किलो धान्य म्हणजेच गहू ३ किलो रु २ प्रति किलो आणि तांदूळ २ किलो रु ३ प्रति किलो या दराने पुरविण्यात येते. ३ किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती असतील तर त्यांना सरासरी ३५ किलो धान्य वरील परिमाण व दरानुसार देण्यात येते. अंत्योदय लाभार्थ्यांना प्रति शिधापत्रिका १ किलो साखर रु २० या दराने पुरविण्यात येते. या व्यतिरिक्त उपलब्धतेनुसार प्रति शिधापत्रिका १ किलो तुरदाळ रु ५५ आणि १ किलो चणादाळ रु ४५ या दराने पुरविण्यात येते.

२ (२). अन्नपूर्णा योजना : ज्या ६५ वर्षावरील निराधार व्यक्तींना केंद्र किंवा राज्य शासन पुरस्कृत योजनेंतर्गत निवृत्ती वेतन योजनेचा लाभ मिळत नाही अश्या व्यक्तींना "अन्नपूर्णा योजना" अंतर्गत १० किलो धान्य मोफत देण्यात येते.

वरील APL आणि BPL प्रकारातील सर्व शिधापत्रिका धारकांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आधारकार्डचे आणि शिधापत्रिकांचे लिंक होणे गरजेचे आहे. शिधापत्रिका व आधारकार्ड लिंक झाल्यानंतर या सर्व शिधापत्रिकांना १२ अंकी RC नंबर प्राप्त होतो. तसेच या सर्व शिधापत्रिका महाराष्ट्र शासनाच्या mahafood.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध होतात. या १२ अंकी RC नंबरवरून शिधापत्रिका धारक त्याला नियमित किती रेशन मिळते हे तपासून पाहू शकतो. एखाद्या शिधापत्रिका धारकाच्या कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याचे आधारकार्ड शिधापत्रिकेला लिंक झाले असेल व इतर सदस्यांचे आधारकार्ड लिंक झाले नसेल तरीही त्या शिधापत्रिकेतील ऑनलाईन नावे दिसणाऱ्या सर्व सदस्यांचे धान्य शासनातर्फे पुरविण्यात येते. याठिकाणी रेशन दुकानदार नागरिकांची फसवणूक करत लिंक न झालेल्या नावांचे रेशन नागरिकांना न देता स्वतः हडप करतात. याबाबत नागरिकांनी जागृत राहून आपले पूर्ण धान्य घेऊन epos मशिनमधून निघालेली पावती आग्रहाने घ्यावी. सर्वात महत्वाचे : - सलग २-३ महिने रेशन न घेतल्यास आपले रेशनकार्ड बंद होण्याची शक्यता असते.

ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु १ लाख पेक्षा जास्त आहे त्यांना शुभ्र शिधापत्रिका देण्यात येते. APL शिधापत्रिका व शुभ्र शिधापत्रिका यावर नियमित रेशन उपलब्ध होत नाही.

शासन गेली ३-४ वर्ष जनतेला आपली शिधापत्रिका आणि आधारकार्ड लिंक करण्याबाबत तसेच शिधापत्रिका संबंधी फॉर्म भरून देण्याबाबत सूचना देत आहे, मात्र जनतेकडून त्याला योग्य प्रतिसाद न मिळाल्याने कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रु ५९००० च्या आत असलेल्या अनेक शिधापत्रिका 'प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी' आणि 'अंत्योदय लाभार्थी' या गटात येण्यापासून वंचित राहिले आहेत. अश्या शिधापत्रिका धारकांनी तसेच इतर रु १ लाखाच्या आत कौटुंबिक उत्पन्न असलेल्या शिधापत्रिका धारकांनी लॉकडाउन संपल्यानंतर वरील गटामध्ये समाविष्ट करण्याबाबतचा अर्ज, शिधापत्रिकेवरील सर्व सदस्यांच्या आधारकार्डची झेरॉक्स, कोणत्याही एका व्यक्तीच्या बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स आणि शिधापत्रिकेच्या झेरॉक्सची प्रत शिधावाटप कार्यालय / तहसील कार्यालय या ठिकाणी जमा करून त्याचा पाठपुरावा करा. यामुळे त्या शिधापत्रिकांवर नियमित स्वस्त दारात धान्य उपलब्ध होईल. महाराष्ट्रातील इष्टांक शिल्लक असल्याने कायदेशीर उत्पन्न मर्यादेच्या पलीकडील उत्पन्न असणाऱ्या केशरी शिधापत्रिका धारकांना या गोष्टीचा फायदा होणार आहे.


(२). सध्या कोरोना विषाणूच्या आजरामुळे लॉकडाउन असल्याने अनेकांचे रोजगार बंद झाले आहेत. यामुळे केंद्र सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ मध्ये समावेश असलेल्या प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी व अंत्योदय लाभार्थी  शिधापत्रिका धारकांना नोव्हेंबर २०२० पर्यंत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत अतिरिक्त प्रतिव्यक्ती ५ किलो तांदूळ (किंवा ३ किलो गहू + २ किलो तांदूळ) व १ किलो तूरडाळ किंवा चणाडाळ मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी  शिधापत्रिका लाभार्थ्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा लाभ मिळणार नाही.

त्याच बरोबर राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ मध्ये समाविष्ट होऊ न शकलेल्या केशरी (APL) शिधापत्रिका धारकांना, बंद शिधापत्रिका धारकांना ऑगस्ट महिन्यापर्यंत प्रति व्यक्ती ५ किलो धान्य अल्पदरात (गहू प्रति व्यक्ती ३ किलो रु ८ प्रति किलो + तांदूळ प्रति व्यक्ती २ किलो रु १२ प्रति किलो) असे देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्या प्रमाणे धान्य वाटप सुरु झाले आहे.


(३). नेहमी उपस्थित होणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे 

१. माझे नाव ऑनलाईन दिसते मात्र आधारकार्ड लिंक झालेले दिसत नाही. अश्या परिस्थितीमध्ये मला रेशन मिळेल का?

उत्तर : अनेकवेळा शिधापत्रिकेमधील एकाच व्यक्तीचे नाव आधार लिंक असल्याचे ऑनलाईन दिसते, इतर व्यक्तींचे नाव ऑनलाईन दिसते मात्र ते आधार लिंक झालेले दिसत नाहीत. अश्यावेळी ऑनलाईन दिसणाऱ्या सर्व व्यक्तींच्या नावे शासनाने रेशन उपलब्ध करून दिलेले असते आणि ते तुम्हाला मिळालेच पाहिजे. याठिकाणी रेशन दुकानदार ग्राहकांची फसवणूक करत आधार लिंक न झालेल्या व्यक्तींचे रेशन हडप करतात.

आपली फसवणूक टाळण्यासाठी नियमितपणे रेशनची पावती घ्या. रेशन साक्षर व्हा

२. माझी शिधापत्रिका केशरी आहे, ती बंद आहे. मला रेशन मिळेल का?

उत्तर : केंद्र सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ मध्ये समाविष्ट होऊ न शकलेल्या केशरी (APL) शिधापत्रिका धारकांना ऑगस्ट महिन्यापर्यंत प्रति व्यक्ती ५ किलो धान्य अल्पदरात (गहू प्रति व्यक्ती ३ किलो रु ८ प्रति किलो + तांदूळ प्रति व्यक्ती २ किलो रु १२ प्रति किलो) असे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अंतर्गत...

A. कौटुंबिक वार्षिक रु १ लाख पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या APL (केशरी) शिधापत्रिका धारक,

B. ज्यांची शिधापत्रिका ऑनलाईन झाले नाही असे,

C. ज्यांची शिधापत्रिका बंद आहे असे,

D. ज्यांना सध्या रेशनचे लाभ मिळत नाही असे.

या सर्वांना अल्पदरात धान्य पुरवठा करण्यात येणार आहे.

आपली फसवणूक टाळण्यासाठी नियमितपणे रेशनची पावती घ्या.

रेशन साक्षर व्हा.

३. मी एका शहरात राहतो व आता कामानिमित्त दुसऱ्या शहरात आलो आहे. मला येथे माझे रेशन घेता येईल का?

उत्तर : महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी, अंत्योदय लाभार्थी तसेच अन्नपूर्णा लाभार्थी यांना महाराष्ट्रातील कोणत्याही रेशन

दुकानातून रेशन घेता येते. या पद्धतीला पोर्टेबिलिटी म्हणतात. रेशन दुकानदार जर आपल्याला पोर्टेबिलिटी प्रमाणे रेशन देण्यास नकार देत असेल तर या माहितीच्या सर्वात शेवटी नमूद केलेल्या ठिकाणी तक्रार करा. 

लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्ही तुमच्या अधिकारासाठी संघर्ष करणार नाही तोपर्यंत तुम्हाला तुमचे अधिकार मिळणार नाही.

४. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचे मोफतचे धान्य व डाळ मला मिळेल का?

उत्तर: हे धान्य व डाळ फक्त प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी आणि अंत्योदय लाभार्थी यांनाच मिळणार आहेत. APL रेशनकार्ड धारक तसेच शेतकरी लाभार्थी यांना या

योजनेचा लाभ मिळणार नाही.

५. माझी शिधापत्रिका बंद आहे, आधार लिंक नाही काय करावे?

उत्तर : लॉकडाउन संपल्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आधारकार्डची झेरॉक्स, एका व्यक्तीच्या बँक पासबुकची झेरॉक्स आणि शिधापत्रिका झेरॉक्स रेशन कार्यालयात (तहसील कार्यालयात) अर्जांसाहित जमा करावी. यानंतर साधारण एक महिन्याने कार्यालयात जाऊन आपल्या कामाचा पाठपुरावा करावा.

६. रेशन दुकानदार नियमाप्रमाणे रेशन देत नाही.

उत्तर : रेशनदुकानदार आपल्याला आपल्या हक्काचे रेशन देत नसेल तर त्याची या माहितीच्या सर्वात शेवटी नमूद केलेल्या ठिकाणी तक्रार करा. 

७. आम्हाला रेशन दुकानदार पावती देत नाही.

उत्तर : रेशनवर आपण जे काही धान्य किंवा इतर वस्तू घेतो त्याची रीतसर मशीनद्वारे आलेली पावती ग्राहकाला देण्यात यावी असा शासकीय नियम आहे. कोणत्याही कारणाने जर रेशन दुकानदार आपल्याला पावती देत नसेल तर तो आपली फसवणूक करत आहे.

या माहितीच्या सर्वात शेवटी नमूद केलेल्या ठिकाणी तक्रार करा. 

८. रेशन दुकान नियमितपणे उघडले जात नाही अथवा बंदच असते.

उत्तर : शासकीय नियमानुसार साप्ताहिक सुट्टी वगळता रेशन दुकान दररोज सकाळी चार तास आणि सायंकाळी चार तास सुरु ठेवावे लागते. म्हणजेच सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत आणि सायंकाळी ४ ते ८ वाजेपर्यंत.

९. रेशनबाबत कोणतीही अनियमितता होत असेल, निकृष्ठ दर्जाचे धान्य मिळत असेल तर तक्रार कुठे करायची?

उत्तर : रेशनबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार करायची असल्यास ती या माहितीच्या सर्वात शेवटी नमूद केलेल्या ठिकाणी करा.


(४). इतर नियम

१. महिन्यातून कितीही वेळा रेशन घेता येते. त्याची प्रत्येक वेळी पावती देणे दुकानदारास बंधनकारक आहे.

२. नागरिकांसाठी रेशन दुकानाच्या दर्शनी भागात तक्रार पुस्तक ठेवलेले पाहिजे.

३. कोणाला किती रेशन कोणत्या दराने मिळते याचा तक्ता रेशन दुकानाच्या दर्शनी भागात नागरिकांना व्यवस्थित वाचता येईल अश्याप्रकारे लावणे बंधनकारक आहे.

४. लाभार्थ्यांची यादी रेशन दुकानाच्या बाहेर दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे.

५. ग्राहकांचे हक्क काय आहेत याबाबत माहिती असलेला फलक रेशन दुकानाच्या बाहेर दर्शनी भागात लावणे बंधन कारक आहे.

६. केंद्र व राज्य सरकारने वेळोवेळो बनविलेले रेशन विषयक नियम रेशन दुकानाच्या बाहेर प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे.

७. ग्राहकाचे रेशनकार्ड ठेऊन घेण्याचा रेशन दुकानदारास कोणताही अधिकार नाही.


(५) रेशन संबंधी कोणतीही तक्रार असल्यास ती खाली नमूद केलेल्या ठिकाणी करा.

१. वेबसाइट : http://mahafood.gov.in/pggrams/

२. E-Mail :- helpline.mhpds@gov.in

३. हेल्पलाईनचा दूरध्वनी क्रमांक :-

१८०० २२ २२६२

४. रेशन कार्यालयात (तहसीलदार कार्यालय) उपलब्ध असलेल्या तक्रार पुस्तकात. 

५. प्रत्येक रेशन दुकानात उपलब्ध असलेल्या तक्रार पुस्तकात.

६. स्थानिक पोलीस स्टेशनमध्येही लेखी तक्रार करता येते. 

७. आपल्या तक्रारीची एक प्रत (CC) आपल्या संपर्क नंबर सहित खालील ई-मेल वर पाठवा.

aapleration@gmail.com


(६) रेशनकार्डवर RC नंबर मिळाला नसेल तर तो या साईटवरून मिळवा.

https://rcms.mahafood.gov.in/PublicLogin/frmPublicUserRegistration.aspx

१. साईट ओपन केल्यानंतर पिवळ्या रंगाच्या No Ration Card वर क्लिक करा.

२. नाव आणि आधारकार्डची माहिती भरून Verify Aadhar वर क्लिक करा.

३. नंतर त्याच पेजवर लाल रंगाने लिहिलेला आपला RC नंबर दिसेल. तो लिहून घ्या.


(७) आपले रेशन स्वतःच जाणून घ्या.

शासनातर्फे आपल्याला दर महिन्याला किती रेशन मिळते हे तपासून पाहण्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये

http://www.mahaepos.gov.in/SRC_Trans_Int.jsp

या लिंक वर आपला १२ अंकी रेशन कार्ड नंबर टाकून आपल्या हक्काचे रेशन जाणून घ्या.

नियमित रेशनची पावती घ्या.

रेशन साक्षर व्हा.


संकलन :

राजेश बबन कौठाळे 9096083860

अशोक रामबोध शाह 9324035996